National Education Day 2021


Event Info

About this Program -


❀ ११ नोव्हेंबर ❀भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जन्मदिन

************************************************************************************************

जन्म - ११ नोव्हेंबर १८८८ (मक्का)
स्मृती - २३ फेब्रुवारी १९५८

देशाचे पहिले शिक्षण मंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. अबुल कलाम आझाद यांचे मूळ नाव अबुल कलाम मोहनुद्दीन होते. अबुल कलाम म्हणजेच ‘वाचस्पती’ ही पदवी त्यांना मिळाली होती. पुढे ते आझाद नाव लावू लागले. आझाद यांचे वडील भारतीय होते, तर आई अरब होती.

आझाद यांना लहानपणापासून वाचन, लेखनाची हौस होती. त्यांनी फारसी, उर्दू, अरबी भाषांचे ज्ञान मिळविले. तसेच तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान, गणित या विषयांचा अभ्यास केला. आझाद यांनी लोकजागृतीसाठी कोलकता येथे ‘अल हिलाल’ हे उर्दू साप्ताहिक सुरू केले; पण इंग्रज सरकारने त्यावर बंदी घातली. नंतर त्यांनी ‘अल बलाग’ हे दुसरं साप्ताहिक सुरू केले.

मौलाना आझाद त्यांच्या लेखनातून ब्रिटिश राजवटी विरुद्ध जनतेला जागृत करत. जनतेच्या मनात अन्याया विरुद्ध लढण्याची जाणीव निर्माण करत. विशेषत: मुस्लिमांनी हिंदू समाजाच्या बरोबरीनं ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करावा, असं ते त्यांच्या लेखनातून, भाषणातून सांगत. आपल्या धर्माची तत्त्वं त्यांनी जपली. मात्र, खरा धर्म मानवता धर्म आहे, या मानवतावादी धर्माचे आचरण करावे, त्यातूनच समाजाची आणि देशाची सेवा करावी, ही गोष्ट मौलाना आझाद यांना गांधीजींकडून कळाली. ते गांधीजींचे अनुयायी बनले. पुढे काँग्रेसचे प्रमुख नेते झाले. वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तेव्हा अध्यक्षीय भाषणात हिंदू-मुस्लिम ऐक्यावर त्यांनी भर दिला.

८ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिश सरकारला ‘भारत छोडो’चा इशारा देण्यात आला. तेव्हा प्रमुख काँग्रेस नेत्यांची धरपकड झाली. अर्थातच, मौलाना आझाद यांनाही अटक झाली. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. पं.जवाहरलाल नेहरूंनी मौलानांकडे शिक्षण मंत्रालयाचे काम सोपवले व ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री झाले. त्यांनी त्या काळी अत्यंत बिकट परिस्थितीतही भारतात शिक्षणाचा प्रसार व प्रचार उत्तम प्रकारे राबवला.

मौलाना आझाद यांना युरोपच्या तत्कालीन समस्यांचे चांगले ज्ञान होते. जर्मन आणि इटलीच्या सत्ताधा-यांची दडपशाही संपूर्ण जगासाठी मोठा धोका ठरणार आहे, असे ते सांगत. हिटलरच्या काळात अल्पसंख्याक आणि बुद्धिजीवींची सर्रास कत्तल होईल हे मौलानांनी सांगितले होते आणि तसेच घडले हे जगाने पाहिले.

हाऊस ऑफ लार्ड्सचे सदस्य लॉर्ड बटमली, ज्यांनी जवळपास साठ वर्षे इंग्लंड व भारताच्या राजकारणात भाग घेतला, ते मौलानांबद्दल म्हणतात, ‘मौलाना आझाद विशाल मनाचे व्यक्ती होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य व अखंडतेसाठी कायम प्रयत्नांची पराकाष्ठा केली. स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका खूप मोलाची आहे.

मौलाना आझाद यांना युरोपियन साहित्याचेही चांगले ज्ञान होते. महाकवी बायरन आणि फ्रान्सच्या कादंबरीकारांची त्यांना चांगली माहिती होती. त्यांचे शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्ष होते. आधुनिक शास्त्रे आणि आधुनिक विचार यांनाच त्यांच्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य होते.

मौलाना आझाद एक प्रभावी वक्ते होते, तसेच उत्तम लेखकही होते. ‘तरजुमानुल कोरान’ हा त्यांनी केलेला कुराणाचा अनुवाद प्रसिद्ध आहे. ‘इंडिया विन्स फ्रिडम’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध करण्यात आले. मौलाना आझाद यांच्या कार्याची दखल महाराष्ट्रानेही घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने मौलाना आझाद यांच्या नावाने वित्तसंस्था उभारली आहे. या वित्तसंस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील अल्पसंख्याक, विशेषत: मुस्लिम समाजातील गरीब व्यावसायिकांना आर्थिक मदत होत आहे. हजारो अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे. इतर राज्यांतही मौलाना आझादांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत.

हैदराबाद येथे मौलाना आझाद मुक्त विद्यापीठ उभारण्यात आले आहे. केंद्र सरकारने १९९२ मध्ये मौलाना आझाद यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताब प्रदान केला. मौलाना आझादांचा जन्मदिवस ११ नोव्हेंबर हा ‘शिक्षण दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

************************************************************************************************